Friday 4 November 2011

इमू पालन व्यवसाय अडचणीत अंडे विक्री होत नसल्याने लाखो रूपयांचे नुकसान


इमू पालन व्यवसाय अडचणीत अंडे विक्री होत नसल्याने लाखो रूपयांचे नुकसान


भोकरदन - जाफराबाद तालुक्यात १५ शेतकर्‍यांकडे इमू पालन व्यवसाय आहे. यातून शेतकर्‍यांना अंड्याचे उत्पादन सुरू झाले मात्र या अंड्याची विक्री होत नसल्याने इमू पालनाचा व्यवसाय करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यामुळे आठ शेतकर्‍यांपुढे बंकेकडून घेतलेले २२ लाख कर्ज फेडण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
शेतीसाठी जोड व्यवसाय म्हणून इमू पालन हा चांगला व्यवसाय म्हणून चर्चेला आला होता. दोन वर्षा पूर्वी काही शेतकर्‍यानी चांगले उत्पादन मिळाले. त्यामुळे शेतकरी मोठय़ा प्रमाणात इमू पालनाच्या व्यवसायाकडे वळले. भोकरदन व जाफराबाद तालुक्यात १५ शेतकर्‍यांनी ८४ लाख, ७ हजार रूपयाची गुंतवणूक करून इमू पालनाचा जोड व्यवसाय सुरू केला. आतापर्यंत १ कोटी, ६५ लाख, ७ हजार रूपये खर्च करण्यात आला आहे. शेतकर्‍याकडे एकू ण ४९८ इमू पक्षी आहेत. गेल्या देान वर्षापूर्वी त्यांनी हे पक्षी बीड जिल्यातून प्रत्येकी ८ हजार रूपयाला खरेदी केले. या पक्षांची किमंत सुमारे ४0 लक्ष रूपये होते. या पक्षांना दररोज २ हजार रूपयाचे खाद्य लागते. शेतकर्‍यांनी आता पर्यंत हा खर्च बॅंकेकडून कर्ज काढून केला होता. तर काही शेतकर्‍यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतले काढून आता पर्यंत व्यवस्थित व्यवसाय केला आहे. सध्या या पक्षांच्या उत्पादनाला सुरुवात झाली आहे. गेल्या पंधरा दिवसा पासून इमू अंडे देत असल्याचे संजय भिकाजी साळवे यांनी सांगितले.
अंडे खरेदीस नकार
तयार अंडे खरेदीचा करार केलेल्या बीड येथील व्यापार्‍याने सध्या मशीन बंद आहे म्हणून अंडे खरेदीस नाकार दिला आहे. तर नाशिक येथील मोठा प्रकल्प बंद झाला आहे. त्यामुळे या अंड्यांचे काय करायचे असा प्रश्न या शेतकर्‍यांना पडला आहे.
शासनाने या इमू पालनाच्या व्यवसाय करणार्‍या शेतकर्‍यांना काही ठिकाणी अनुदान सुध्दा दिल्याचे समजते; मात्र अंड्याची विक्री बाबत काहीही निर्णय घेतला नसल्याने हे व्यवसायिक मोठय़ा अडचणीत आहेत.
तालुक्यातील विठोबा शेनफड कड, रा. पिपंळगाव कड, रामकिशन माधवराव कोल्हे,रा. पिपंळगाव कड, सारंगधर धोडीबा कोल्हे, रा. पिंपळगाव कड, लक्ष्मण दशरथ चव्हाण, धोडखेडा, अमोल शेषराव लोखंडे, बंरजळा लोखडे, कैलास पांडूरंग शिंदे भोकरदन, या शेतकर्‍यांनी विविध बॅकेकडून २२ लाख ५0 हजार रूपये कर्ज घेतले आहे. तर दशरथ भीमराव चव्हाण, रा. पिंपळगाव कड, संजय भिकाजी साळवे, रा. वरूड, रामेश्‍वर नानासाहेब रोकडे, खापरखेडा, रमेश त्र्यंबक सुसर, रा. लिंगेवाडी, पंढरीनाथ शामराव लोखंडे, रा. बरंजळा लोखंडे, रामदास आनंदा लोखंडे, रा. बरंजळा लोखंडे, प्रदीप दगडुजी बदर, रा. बरंजळा लोखंडे, दामोधर रामराव लोखंडे, रा. बरंजळा लोखंडे, व दीपक मोरे रा. भोकरदन या शेतकर्‍यानी इमू पालनाचा व्यवसाय सुरू केला असून त्यापासून निघणारे अंडे खरेदी करण्यास कोणीही तयार नसल्याने शेतकरी मोठया अडचणीत सापडले आहे. या शेतकर्‍यानी ज्याच्याकडून हे पक्षी खरेदी केले. त्यांनी सुरूवातील झेरॉक्स प्रतिवर १ हजार ५00 रूपये प्रति अंडे या भावाने खरेदी करण्याचा करार सुध्दा केलेला आहे. शेतकरी अंडे घेऊन बीड जिल्ह्यात जाऊन आले मात्र सध्या पिलाचे उत्पादन सुरू केलेले नाही, असे सांगून या व्यापार्‍याने या शेतकर्‍यांना परत पाठविले आहे. या शेतकर्‍यांचे अंड्याचे उत्पादन थंडी सुरू झाल्याने वाढतच असून या अंड्याचे काय करायचे असा प्रश्न त्यांच्या समोर पडला आहेत.
या बाबत विठोबा शेनफड कड यांनी सांगितले की, सुरुवातीला शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय चांगला म्हणून आम्ही काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. तेंव्हा अंडे खरेदीसाठी व्यापारी अगोदरच पैसे देत असत. काही शेतकर्‍यांनी यामधून चांगले उत्पादन मिळविले. हे पाहून आंम्ही सुध्दा बीड जिल्ह्यातून पक्षी खरेदी केले व वाढविले. आता उत्पादन सुरू झाले आहे; मात्र अंडे विक्री होत नाही, तसेच हे अंडे ठेवण्यासाठी आमच्याकडे काही व्यवस्था नाही. त्यामुळे अंडी खराब होत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. बॅंकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कोठून करावी असा शेतकर्‍यांना प्रश्न पडलाआहे. पक्षांना दररोज खाद्य लागते त्यामुळे खर्च सुरूच आहे. पक्षी सुध्दा सोडून देता येत नाही. त्यांना कोणी खरेदी सुध्दा करीत नाही. त्यामुळे या व्यवसायिक अडचणीत सापडले आहे.पक्षांना धरले तर चावतात. अनुदान देणार्‍या शासणाने यात काही तरी निर्णय घेणे आवश्यक आहे. असे. हा व्यवसाय करनार्‍या शेतकर्‍यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Blog Archive